लोणावळ्याजवळ कार्ला येथील एकवीरा गडावर नववर्षारंभाच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र काही अतिउत्साही भाविकांनी मनाई असतानाही मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके फोडले. फटाक्यांमुळे मधमाशांच्या पोळ्यांना इजा पोहोचल्याने चवताळलेल्या मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गडावर एकच हाहाकार उडाला. तीक्ष्ण दंशामुळे किमान 60 भाविक जखमी झाले. त्यामध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे.
चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडवा ते चैत्र अष्टमी हा एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेचा कालावधी असतो. यात्रेतील पालखी सोहळ्याला मुंबई, ठाणे, रायगड व कोकणातील लाखो भाविक दर्शन व नवस फेडण्यासाठी येतात. मुंबईतील कुलाबा येथून देवीची पालखी घेऊन आलेल्या भाविकांपैकी काहींनी रंगीत फटाके वाजवले. त्यामुळे प्रचंड धूर झाला. गडाच्या परिसरातील झाडाच्या फांदीवर असलेल्या मधमाशांच्या पोळय़ांपर्यंत धुरांचे लोट पोहोचले. धुरामुळे मधमाशा उठल्या आणि भाविकांची पळापळ झाली. अनेकांना मधमाशांनी डंख मारला.
कठोर पावले उचलण्याची गरज
उत्सव व यात्रेतील पालखी सोहळ्याला लाखो भाविक दर्शन व नवस फेडण्यासाठी येतात. या वेळी देवीच्या मंदिराच्या आवारात मोठी गर्दी असते. अशा वेळी अशी घटना घडल्यास किती मोठा अनर्थ होईल, याचा विचार करून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अतिउत्साहीपणाला आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी त्या त्या पालखी प्रमुख, समाजातील जाणकारांसह देवस्थान ट्रस्ट, पुरातत्व विभाग, पोलीस व संबंधित प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
मधमाशांच्या हल्ल्याने गडावर हाहाकार उडाला. भाविक सैरावैरा पळू लागले. महिलांनी ओढणीचा आधार घेतला. काहींनी जमिनीवर लोटांगण घातले. शर्ट काढून मुलांना डंखापासून वाचवण्याची धडपड अनेकजण करत होते.
जखमींना लोणावळा व कार्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना फटाक्यांच्या धुरामुळे की अन्य कारणाने घडली याचा तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फटाके फोडण्यावरील बंदी कडक करा
एकवीरा गडावर फटाके वाजविण्यास बंदी आहे. परंतु काही भाविक या नियमांकडे दुर्लक्ष करतात. या घटनेनंतर ग्रामस्थांनी गडावर फटाके फोडण्यावरील बंदी अधिक कडक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भाविकांनी गडावर नियमांचे पालन करावे आणि प्राचीन ठिकाणाच्या संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.