देशात अदानी बचाव सिंडिकेट, राहुल गांधी यांचा पुन्हा सेबीच्या अध्यक्षांवर हल्ला

सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच या अदानींचा पैसा, त्यांचे मूल्य आणि प्रतिष्ठा वाचवत आहेत हे उघड आहे. असे असताना त्यांना कोण आणि का वाचवतेय? देशात अदानी बचाव सिंडिकेट सुरू आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा सेबीच्या अध्यक्षांवर जोरदार हल्ला चढवला. सध्याचे सरकार केवळ उद्योगपतींच्या मोनोपॉलीलाच प्रोत्साहन देत नाही तर देशाची संपत्ती काही मोजक्याच लोकांच्या हातात देत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसच्या मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांच्या कारनाम्यांबाबत राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी राहुल गांधी यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले. याचा व्हिडीयो काँग्रेसने एक्सवरून पोस्ट केला आहे. या वेळी पवन खेरा म्हणाले, मला काही दस्तावेज मिळाले आहेत. त्यांची मी पडताळणी केली. त्यानंतर माझ्यासमोर अनेक धक्कादायक गोष्टी आल्या, असे पवन खेरा यांनी सांगितले.

यावर माधवी बुच स्कँडल जसे दिसते त्याहून अधिक खोल आहे, असे राहुल गांधी म्हणाले. बुच यांनी केवळ अदानी यांच्या हितांचे रक्षण केले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीला धरली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस हा मुद्दा सातत्याने उचलून धरेल आणि या घोटाळ्याचा मुळापर्यंत तपास करून सत्य जनतेसमोर आणेल, असेही राहुल गांधी म्हणाले.