लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या आणि भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच राज्य सरकारमध्ये फेरबदलाची शक्यताही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला मिसलीड केलं. एक खूप आशादायक चित्र निर्माण केलं. त्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल. त्यामुळे कुठेतरी भाजपचा ग्राउंड रियाअॅलिटी टच संपलेला आहे. त्यांनी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्याला नरेंद्र मोदींचा थेट आशीर्वाद मिळवला. त्याची जबाबदारी त्यांना घ्यावीच लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पराभवाचं विश्लेषण ते करतील. पण आता एकंदरीतच महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या रचनेत बदल होणार आहे का? मुख्यमंत्री बदलला जाणार आहे का? की फक्त देवेंद्र फडणवीसच पक्षाची जबाबदारी घेऊन पुढे जातील आणि त्यांना सत्तेतून मुक्त करणार का? हे भाजप ठरवेल. हा त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकेल, असे चव्हाण पुढे म्हणाले.
काहीतरी चुकलं आहे, याची जाणीव झाली हे बरं झालं. पण आता सरकार समोर दुष्काळ हाताळणं ही महत्त्वाची बाब आहे. निवडणुकीचा निकाल लागला आहे. आचारसंहिताही संपली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेच्या दुःखाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
ठणकावून येणार सांगणारे दणकून पडले, शरद पवारांच्या पक्षाचा फडणवीसांना टोला
हे पांगळं सरकार आहे. विधानसभेची निवडणूक एक दोन महिन्यांत जाहीर होईल. त्यामुळे या सरकारमध्ये फार काही दम राहिलेला नाही. परंतु कोणाच्या नेतृत्वाखाली जायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला या मुद्द्यावर मोठा निर्णय घ्यावा लागेल. मंत्रिमंडळातून देवेंद्र फडणवीस बाहेर पडले तर तिथे पर्यायी कोण येणार? त्याला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल की त्याला मुख्यमंत्री केले जाईल. किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची जबाबदारी टाकली जाईल. पण एकनाथ शिंदे यांचंही हे अपयश आहे. कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.