लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत सहा टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता उद्या 1 जूनला सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यानंतर 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निवडणूक निकालाआधीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच ‘इंडिया’ आघाडीतील पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘यावेळी आमचे सरकार येणार आहे. ‘इंडिया’ आघाडी 275 हून अधिक जागा जिंकेल. यावेळी आम्हाला प्रत्येक ठिकाणाहून चांगला रिपोर्ट आला आहे’, असे खरगे यांनी सांगितले. एबीपीला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.
‘इंडिया’ आघाडीत पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावरून भाजपने सातत्याने सवाल उपस्थित केला होता. त्यावरही खरगे यांनी उत्तर दिले आहे. ‘निवडणुकीच्या निकालानंतर ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांची बैठक होईल आणि त्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णय घेतला जाईल’, असे खरगे यांनी स्पष्ट केले. सरकार स्थापनेसाठी कोणत्या पक्षांचा पाठिंबा घेणार? नवीन पटनायक, ओवैसी आणि मायावती यांचा पाठिंबा घेणार का? यावरही खरगे स्पष्ट बोलले. ‘निवडणुकीच्या निकालानंतर जो कोण पाठिंबा देईल, त्यावर घटक पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ’, असे ते पुढे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी संध्याकाळीच कन्याकुमारीला पोहोचले होते. कन्याकुमारीत त्यांनी विवेकानंतर रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपात 45 तासांची ध्यानधारणा सुरू केली आहे. यावरूनही मल्लिकार्जुन खरगे यांनी निशाणा साधला आहे. ‘ही ध्यानधारणा म्हणजे निव्वळ दिखावा आहे. त्यांना ध्यानधारणा करायची होती तर आपल्या घरात बसूनही करू शकले असते. दहा हजार पोलिसांना घेऊन तुम्ही ध्यानमग्न कसे होऊ शकता? तुम्हाला सोबत टीव्ही नेण्याचीही गरज नाही. यामुळे हा फक्त एक दिखावा आहे. मोदींना एखाद्या गोष्टीचा पश्चाताप करायचा असेल तर घरीही ध्यानमग्न होऊन करू शकत होते, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे.