लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने गरजू आणि विविध आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. कर्करोग, थॅलेसेमिया, बोन मॅरो ट्रान्सप्लांट यासारख्या आजारांनी ग्रस्त विद्यार्थी आणि गरीब रुग्णांची मुले अशा 250 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. दरम्यान, 10 गरजू आणि मागास विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला हातभार लावल्याने शालेय वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना एक चांगला मदतीचा हात या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाला आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, लिखाणासाठी साहित्य, कंपास बॉक्स, पेन अशा विविध वस्तूंचा पुरवठा या उपक्रमातून करण्यात आला.
कर्करोगाविरोधात लढा देणाऱया रुग्णांना मदत!
कर्करोगाचा सक्षमपणे आणि सातत्याने पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी मुकाबला करणाऱया रुग्णांचा गौरव करण्यात आला. या रुग्णांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ केमोथेरपी घेत कर्करोगाविरुद्ध लढा कायम ठेवला आहे. या रुग्णांना उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
रुग्णालय, रोटरी क्लबचा पुढाकार
लोकमान्य सर्वसाधारण रुग्णालय तसेच रोटरी क्लब ऑफ सायनच्या माध्यमातून गुरुवार, 27 जूनला गरजू व मागास प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱया दहा विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका शिक्षकाच्या मुलीकडून ही मदत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ही मदत योग्य वेळेत मिळावी यासाठी समाजविकास अधिकारी स्मिता नगारे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मेहनत घेतली आहे.