Parliament Winter Session 2024 – अदानींवरून संसदेत आज पुन्हा हंगामा, गदारोळात दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब

वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. प्रियंका गांधी यांनी शपथ घेताच लोकसभेत विरोधी पक्षांनी घोषणा देण्यास सुरू केली. राज्यसभेतही कामकाज सुरू होताच घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी 12 वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा हंगामा झाला. आणि गदारोळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

राज्यसभेत काय घडलं?

अदानी लाचखोरी प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीद्वारे (JPC) चौकशी करावी, संभलमधील हिंसाचार आणि दिल्लीतील गुन्ह्यांच्या घटना, अशा मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी करत एकूण 18 नोटीस दिल्या होत्या. पण राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळून लावली. यामुळे विरोधी पक्षांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. आणि गदारोळातच राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

अदानीच्या घोटाळ्यामुळे जगभरात हिंदुस्थानची बदनामी होत आहे. पण अदानी मोदींचा दोस्त आहेत. त्यामुळे या प्रकरणावर सभागृहात चर्चा होत नाहीये. 2200 कोटींची लाच देऊन अदानीने देशाच्या जनतेला महागड्या दरात वीज विकली आहे. या देशाच्या जनतेला भाजपचे लोक लुटत असतील तर आम्ही इथे गप्प बसणार नाही. आम्ही नियमानुसार चर्चेची मागणी केली. पण सरकार चर्चा होऊच देत नाही, असा हल्लाबोल आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केला.