Parliament Winter Session 2024 – अदानींवरून सलग चौथ्या दिवशी गदारोळ, आता सोमवारी सुरू होणार संसदेचं कामकाज

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशीही गदारोळ झाला. अदानी लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या. यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. आता येत्या सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेचे कामकाज सुरू होईल.

लोकसभा आणि राज्यसभेत शुक्रवारी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी आंदोलन करत घोषणा दिल्या. यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी 12 वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा विरोधी पक्षांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. आता थेट सोमवारी संसदेचे कामकाज सुरू होईल.

लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी विविध विषयांवर स्थगन प्रस्ताव दिले. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांचे प्रस्ताव फेटाळून लावले. नियम 267 नुसार विविध विषयांवर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 16 नोटीस सभापती धनखड यांनी फेटाळल्या. यामुळे विरोधी पक्षांनी घोषणा देत आंदोलन सुरू केले. या गदारोळातच वक्फ सुधारणा विधेयकावर नेमलेल्या संसदेच्या संयुक्त समितीला (JPC) अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कुठल्या मुद्द्यावर कधी चर्चा करायची आहे, हे सरकारने स्पष्ट करावं. अदानी लाचखोर प्रकरण, मणिपूर हिंसाचार, संभलमधील हिंसाचर, चीनच्या मुद्द्यावर आणि परराष्ट्र धोरणारवर चर्चा कधी होणार? हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. त्यांनी विषय आणि तारीखही जाहीर केलेली नाही. जेव्हा सरकार विषय आणि तारीख जाहीर करेल त्यावेळी संसदेचं कामकाज सुरळीत चालेल. पण हे सरकार अहंकारी आहे, अशी टीका काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली.