उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कथित ईव्हीएम घोळ प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दिनेश गुरवला विधानसभा निवडणुकीच्या डय़ुटीपासून दूर ठेवण्यात आले आहे. दिनेश गुरवला निवडणूक डय़ुटीवर ठेवण्यावर आक्षेप घेत अपक्ष उमेदवाराने तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत गुरवला निवडणुकीच्या सर्व डय़ुटीपासून हटवल्याचे निवडणूक अधिकारी डॉ. मोहन नालडकर यांनी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवले.
लोकसभा निवडणुकीत मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचे उघडकीस आले होते. त्या वेळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आयोगाच्या ‘एन्कोर’ पोर्टलचा ऑपरेटर दिनेश गुरवविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या गुह्याच्या पार्श्वभूमीवर गुरवला विधानसभा निवडणुकीची डय़ुटी न देण्याची मागणी करीत अपक्ष उमेदवार रोहन सातोने यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरवला तातडीने निवडणूक डय़ुटीपासून हटवण्यात आले आहे.