Lok Sabha Election Results 2024 : आवाज शिवसेनेचा!

इंडिया-महाविकास आघाडीच्या मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातील मुसंडीनंतर दादरच्या शिवसेना भवनासमोर मुंबईभरातून शिवसैनिकांचे जथेचे जथे टॅक्सी, दुचाकीवरून दाखल होऊ लागले. शिवसेना भवनासमोर विजयाचा गुलाल उधळत, हातात भगव्यावर मशालीचे चिन्ह असलेला झेंडा हातांनी नाचवत ‘कोण आले रे, कोण आले, शिवसेनेचे वाघ आले’, ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची!, ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं,’ ‘अब की, बार भाजप तडीपार,’ ‘मर्द मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला’ अशा घोषणांनी दादर परिसर दुमदुमून गेला. सोबत असलेल्या ढोल, ताशा, सनई आणि तुतारीच्या तालावर शिवसैनिकांनी ठेका धरला. अवघे शिवसेना भवन भगवामय झाले होते.

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरातील इंडिया आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचा आनंद शिवसेना मध्यवर्ती कार्यालय असलेल्या शिवसेना भवन इथे आज पाहायला मिळाला. गुलालाने भगव्या रंगात न्हाऊन निघालेल्या शिवसैनिकांनी हातात भगवा घेऊन नाचून आपला जल्लोष साजरा केला.

उद्धव ठाकरे यांनी वाढवला उत्साह

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात रात्री 8 वाजता दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे होते. उद्धव ठाकरे यांची गाडी शिवसेना भवन येथे दाखल होताच फटाके पह्डून शिवसैनिकांनी स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी हात उंचावून अभिवादन स्वीकारत शिवसैनिकांचा उत्साह वाढवला.

सेल्फी… आयुष्यभरासाठी

गुलालाने माखलेले शिवसैनिक हातात मशाल असलेला भगवा झेंडा आणि दुसऱया हातात मशालचे कटआऊट घेऊन शिवसेना भवनसमोर फोटो आणि सेल्फी काढले जात होते. इंडिया-महाविकास आघाडीच्या विजयाचा आनंद आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासाठी पह्टो, सेल्फी काढले जात होते. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांचे कार्यकर्तेही विजयाचा सेल्फी घेत होते.

आता गद्दारांना ईडी लावू!

शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष पह्डणाऱया गद्दारांना आता धडा शिकवण्याचे दिवस आले असून गद्दारांना आता ईडी लावू. महाराष्ट्र धर्म न पाळणाऱयांना तडीपार करू, अशा प्रतिक्रिया संतप्त शिवसैनिक व्यक्त करत होते.