अब की बार 400 पार चा नारा देणाऱया भाजपला जनतेने चांगलीच अद्दल घडवली. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपने गेल्या दोन दिवसांपासून तयारी केली होती. आज भाजप कार्यालयाबाहेर टेम्पोतून ढोल, ताशे घेऊन मंडळी आली खरी. पण महायुतीची मुंबईत आणि राज्यात दाणादाण उडालेली पाहून आल्या पावली या मंडळींना ढोल, ताशा पुन्हा टेम्पोत चढवण्याचे आदेश देण्यात आले. भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला.
भाजपकडून हजारो लाडू वळले जात होते. गेल्या दोन दिवसांत हे लाडू बनवण्याचे काम दिवसरात्र सुरू होते आणि त्याच्या बातम्या, व्हिडिओ माध्यमातून दाखवले जात होते. हे लाडू आज तयारच होते. पण ते लाडू भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोणाला वाटताना आणि स्वतःही खाताना दिसले नाहीत. मग ते लाडू खाल्ले कोणी, त्या लाडूचे झाले काय, ते लाडू कुठे गायब झाले, याची ईडी चौकशी करावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.