Lok sabha election result : ना मुलगा, ना पत्नी; खासदार करण्यात अजितदादा ठरले अपयशी

 

लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. देशात आणि महाराष्ट्रात NDA ला अपेक्षित यश मिळाले नाही. महाराष्ट्रात तर महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या. यात भाजपला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला. अजित पवार गटाला फक्त रायगड मतदारसंघात विजय मिळाला, मात्र बारामतीसह इतर मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. बारामतीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा देखील पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी आमदार, खासदारांसह बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हही मिळवले. या बंडानंतर बारामती मतदार संघात काय होणार याकडे राज्याचे लक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने येथून सुप्रिया सुळे यांना तिकीट दिले होते. त्यांच्या विरोधात अजित पवार यांनी आपल्या पत्नीला उभे केले. त्यामुळे नणंद-भावजय या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्याच नजरा होत्या.

प्रचाराच्या दरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. शरद पवार यांनी एक एक पत्ते उघडत जुन्या सहकाऱ्यांची भेट घेणे सुरू केले. दुसरीकडे अजितदादा कधी दमदाटी, तर कधी निधीचे आमिष दाखवू लागले. मात्र निकालाच्या दिवशी बारामतीची जनता शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले. सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून दीड लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला.

मुलालाही निवडून आणू शकले नाही

गेल्या लोकसभा (2019) निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ याला मावळ मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे त्यावेळी पार्थ यांच्या नावाला शरद पवार यांचा विरोध होता अशी चर्चा होती. मात्र अजित पवार यांनी मुलाला मैदानात उतरवले. परंतु त्यावेळी शिवसेनेत आणि आता शिंदे गटात असणाऱ्या श्रीरंग बारणे यांनी त्याचा पराभव केला होता.

जुमलेबाजांना जनतेने धडा शिकवला, संविधान बदलू पाहणारी प्रवृत्ती हद्दपार केली; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

अमोल मिटकरी यांचा खळबळजनक आरोप

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बारामतीतील पराभवाचे खापर भाजप आणि शिंदे गटावर फोडले. महाराष्ट्र आणि बारामतीत अजितदादांना भाजप आणि शिंदेंची मते भेटली नसल्यानेच सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. सुनेत्रा पवारांना मिळालेली मते ही फक्त अजित दादांचीच असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आगामी काळात अजितदादा आणि भाजप-शिंदे यांच्यात किती जमतेय हे पाहणे औत्सुक्याचे आहे.