महायुतीच्या आमदारांच्याच मतदारसंघात राहुल शेवाळे यांना धोबीपछाड; धारावीकरांनी पाडला मतांचा पाऊस, चेंबूर, अणुशक्तीनगर, शीव-कोळीवाडय़ात मशाल

 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराच्या मतांची आकडेवारी पुढे आली आहे. अणुशक्तीनगर आणि शीव-कोळीवाडय़ाचे अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. पण महायुतीच्या आमदारांच्याच या मतदारसंघातील मतदारांनी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळ यांना धोबापछाड देत शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांना निवडून दिले आणि राहुल शेवाळे यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, शीव-कोळीवाडा, माहीम व वडाळा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील माहीम व वडाळा विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित चारही मतदारसंघांतील मतदारांनी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना नाकारत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना भरभरून मते दिली. अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नवाब मलिक हे आमदार आहेत, तर शीव-कोळीवाडय़ात भाजपचे तामिळ सेल्वन आमदार आहेत.

शीव-कोळीवाडय़ात फटका

शीव-कोळीवाडा भागातील भाजप आमदार तामिळ सेल्वन व प्रसाद लाड यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यातच शीव- कोळीवाडा व प्रतीक्षानगरमधील नागरी समस्या सोडवण्यात सत्ताधाऱयांना अपयश आले आहे. या भागातील नागरी वसाहतींचा पुनर्विकास रखडला आहे. मतदारांनी ही नाराजी ईव्हीएम मशीन्समधून व्यक्त करीत अनिल देसाई यांच्या पारडय़ात तब्बल 70 हजारांहून अधिक मते टाकली.

अणुशक्तीनगरमध्ये सर्वाधिक मते

या मतदारसंघातील आमदार नवाब मलिक हे राहुल शेवाळे यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. कारण शेवाळे यांनी त्यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता. आजारपणाच्या उपचारांच्या नावाखाली नवाब मलिक हे प्रचारापासून दूर राहिले. परिणामी अनिल देसाई यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल 79 हजार 767 मते मिळाली.

चेंबूरमध्ये नाकारले

चेंबूर मतदारसंघात राहुल शेवाळे यांचे वास्तव्य आहे, पण याच मतदारसंघातील मतदारांनी राहुल शेवाळे यांना मते न देता अनिल देसाई यांना पसंती दिली. धारावीकर जनता तर महायुतीवर नाराजच होती. धारावीकरांनी ही नाराजी मतांमधून व्यक्त करीत शिवसेनेची मशाल हातात धरली.