
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात महविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत मोठ्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर प्रतिभा धानोरकर यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
प्रतिभा धानोरकर यांनी अडीच लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजप नेते आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. सायंकाळी सात वाजता विजयी प्रमाणपत्र घेतल्यानंतर चंद्रपूर शहरातून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशे आणि डीजे तालावर कार्यकर्ते ठेका धरत विजयाचा आनंद घेत होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत ही मिरवणूक गांधी चौकात विसर्जित करण्यात आली. एका रथावर काँग्रेस नेत्यांसोबत प्रतिभा धानोरकर यांनी स्वार होत लोकांना अभिवादन केले.
प्रतिभा धानोरकर यांच्यापूर्वी त्यांचे पती सुरेश धानोरकर 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते, पण कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे पक्षाने यावेळी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्याचा पराभव केला. यामुळे हा विजय महत्वाचा मानला जात आहे. या विजयाचा आनंद मोठा असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होत जल्लोष केला.