लोकसभा निवडणुकीच्या मतदान आकडेवारीतील घोळाचा मुद्दा अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. यासंदर्भात यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील सम्यक जनता पक्षाचे उमेदवार डॉ. अनिल राठोड यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगासह यवतमाळ व वाशीमच्या जिल्हाधिकाऱयांना नोटीस बजावली आणि 26 जूनपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.
डॉ. राठोड यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. डॉ. राठोड यांनी सम्यक जनता पक्षाच्या वतीने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील बूथनिहाय मतदान यादी मागवली होती. त्यातून प्राप्त झालेल्या मतदान आकडेवारीपेक्षा निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत 25 मते जास्त आढळली. तसेच राळेगाव विधानसभा मतदारसंघात 20 मते, तर वाशीम विधानसभा मतदारसंघात 5 मते अधिक आढळली, याकडे याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. डॉ. मोहन एस. गवई यांनी लक्ष वेधले. याची दखल घेत खंडपीठाने पेंद्रीय निवडणूक आयोगासह यवतमाळ व वाशीमच्या जिल्हाधिकाऱयांना नोटीस बजावली आणि प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.
मतमोजणीला स्थगिती नाही
मतदान आकडेवारीतील तफावतीबाबत डॉ. अनिल राठोड यांनी 29 मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे तक्रार केली. जोपर्यंत मतांची आकडेवारी निश्चित होत नाही तोपर्यंत 4 जूनच्या मतमोजणीला स्थगिती द्यावी. तसेच ‘फॉर्म- 17 सी’नुसार बूथनिहाय आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी डॉ. राठोड यांच्या वकिलांनी केली, मात्र खंडपीठाने ही मागणी अमान्य करीत 4 जूनच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास नकार दिला.