Lok Sabha Election 2024 : आवाज शिवसेनेचाच! मोदी रस्त्यावर उतरले, पण मुंबईकरांनी आसमान दाखवले!!

लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला जोरका झटका दिला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडल्यानंतरही महायुतीची 20 चा आकडा गाठतानाही दमछाक झाली आहे.

मुंबईमध्येही भाजप-मिंधे गटाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईतील सहा पैकी 5 मतदारसंघात भाजप-मिधे गटाचा पराभव झाला. चार मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा फडका, तर प्रत्येकी एका जागेवर भाजप आणि काँग्रेसने विजय मिळवला. विशेष म्हणजे मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर उतरूनही मुंबईकरांनी भाजपला आसामान दाखवले आणि इथे आवाज शिवसेनेचाच असणार हे स्पष्ट झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये मिहीर कोटेचा यांच्यासाठी रोड शो घेतला होता. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून दुर्घटना झाली त्याच्या बाजुलाच मोदींनी रोड शो घेतला. यावेळी मेट्रो सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. हा सर्व रोष मतपेटीतून व्यक्त झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी पार्कावरही महायुतीची समारोपाची सभा झाली. त्यानंतरही मुंबईकरांनी आपले मत शिवसेना-महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीला 18 जागांवर समाधान मानावे लागणार असे चित्र असून महाविकास आघाडीने 29 जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेने एकूण 41 जागा (भाजप 23 आणि शिवसेना 18) जिंकल्या होत्या. मात्र यंदा शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडल्यानंतरही महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही.