लोकशाहीच्या उत्सवाला मराठवाड्यात शुक्रवारी प्रारंभ होत आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी तसेच हिंगोली मतदारसंघांत अठराव्या लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने मतदानाची जय्यत तयारी केली असून, गुरुवारी सकाळीच मतदान कर्मचारी केंद्रांकडे साहित्य घेऊन रवाना झाले आहेत. उन्हाचा तडाखा, दाट लग्नतिथीमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शुक्रवार, 26 एप्रिल रोजी देशभरातील 13 राज्यांमधील 89 मतदारसंघांमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यात मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक विभागाच्या वतीने मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, आज सकाळपासूनच कर्मचारी साहित्य घेऊन केंद्राकडे रवाना केले आहेत. सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ होणार आहे. मतदान सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. नांदेड मतदारसंघात 23, हिंगोलीत 33 तर परभणी मतदारसंघात 34 उमेदवार रिंगणात आहेत.
मराठवाडा तसेच विदर्भात सध्या उष्णतेची भयंकर लाट आहे. तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असून, त्यात पंखे, पाण्याची सोय करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर आरोग्य पथकेही तैनात असणार आहेत. मतदान निर्धोक आणि भयमुक्त वातावरणात व्हावे यासाठी चोख बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. 26 एप्रिल रोजी लग्नतिथीही आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने ‘आधी मतदान, मग लग्न’ अशी जनजागृती मोहीमही राबवण्यात आली.
नांदेड मतदारसंघात भाजपचे प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात लढत होत आहे. मतदारसंघात 2062 मतदान केंद्रे असून 18.51 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात प्रथमच 16 मतदान केंद्रे महिला चालवणार आहेत.
हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागेश पाटील आष्टीकर आणि मिंधे गटाचे बाबुराव कदम कोहाळीकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे बी. डी. चव्हाण यांच्यात लढत होत आहे. 2006 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली असून, 18.17 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
परभणी मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय जाधव आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात थेट लढत होत आहे. 2290 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, 21.23 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बुलढाणा मतदारसंघात 1962 मतदार केंद्रांवर 17.82 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रा. नरेंद्र खेडेकर, िंमधे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.