Lok Sabha Election 2024 Result : ‘इंडिया’ आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार का? राहुल गांधी यांचे सूचक उत्तर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीने जबरदस्त कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाध साधत सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. विशेष करून यूपीच्या जनतेने कमाल केली, असे राहुल गांधी म्हणाले. ‘इंडिया’ आघाडी सत्ता स्थापनेसाठी दावा करणार का? यावरही राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली.

ही निवडणूक ‘इंडिया’ आघाडी आणि काँग्रेस पक्ष फक्त एका राजकीय पक्षाविरोधात लढले नाही. तर ही निवडणूक भाजप, हिंदुस्थानच्या काही संस्था, हिंदुस्थानमधील प्रशासकीय यंत्रणा, गुप्तचर संस्था, सीबीआय, ईडी, अर्धी न्यायव्यवस्था या सर्वांविरोधात आम्ही लढलो. कारण या सर्व संस्था आणि यंत्रणांवर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी ताबा मिळवला. त्यांना हाताशी धरून धमकावलं आणि घाबरवलं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

आमची लढाई संविधान वाचवण्याची होती. यांनी आमचं बँक खातं बंद केलं. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवलं. राजकीय पक्ष फोडले. यामुळे हिंदुस्थानची जनता आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी एकजूट होऊन लढेल, अशी मला अपेक्षा होता. आणि हे खरं ठरलं. हिंदुस्थानच्या जनतेचे, ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांचे, काँग्रेस पक्षातील सर्व नेत्यांचे आणि बब्बर शेर कार्यकर्त्यांचे हृदयापासून आभार मानतो. तुम्ही संविधान वाचवण्याठी पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल उचललं आहे, असे ते पुढे म्हणाले.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी दोन-तीन गोष्टी केल्या. आम्ही ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांचा आदर केला. त्यांच्या अपेक्षांचा विचार केला आणि त्यांना आपल्यासोबत घेतलं. जिथे आघाडी करून लढलो तिथे आम्ही एकजूट होऊन लढलो. काँग्रेसने पक्षाने हिंदुस्थानला एक नवीन व्हिजन दिले आहे. प्रो-पूअर आणि प्रो-प्रोडक्शन व्हिजन हिंदुस्थानला ‘इंडिया’ आघाडीने दिल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीने जी कामगिरी केली आहे, त्यामागे संविधान, आरक्षणावर भाजपने केलेले आक्रमण, गरीबी, अदानींचे शेअर, हे कारण आहे. जनता अदानींचा संबंध थेट मोदींशी जोडत आहे. मोदींचा पराभव झाल्यास शेअर बाजारात म्हटलं जातं, मोदी गेले तर अदानीही जातील. म्हणजे भ्रष्टाचाराचा थेट संबंध जोडला जात आहे. म्हणून तुम्ही आम्हाला नकोय, हा स्पष्ट संदेश देशाने मोदींना दिला आहे.

संविधान वाचवण्याचं काम हिंदुस्थानच्या सर्वांत गरीब लोकांनी केलं. दलितांनी, मजुरांनी, आदिवासींनी आणि मागसवर्गीयांनी केलं. हे संविधान या देशाचा आवाज आहे. अनेकजण संविधान वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत. ते गप्प राहिले. पण हिंदुस्थानमधील सर्वात गरीब उभे राहिले आणि त्यांनी संविधान वाचवले. त्या सर्वांचे आभार मानतो. काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे. जी आश्वासनं आम्ही दिली होती, ती पूर्ण करू. जातनिहाय जनगणना, महालक्ष्मी योजना ही आमची आश्वासनं आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

टीडीपी, जेडीयूला सोबत घेऊन सरकार स्थापन करणार का? प्रश्न राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. आम्ही आघाडीतील मित्रपक्षांसोबत चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलंही वक्तव्य करणार नाही. जो निर्णय ‘इंडिया’ आघाडी मिळून घेईल, त्यावर पुढचं पाऊल टाकलं जाईल, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघांमधून विजय झाला आहे. या विजयाबद्दल तेथील जनतेचे मनापासून आभार मानतो. कुठल्या जागेवर राहायचं, हे अद्याप ठरवलेलं नाही. चर्चा करून मग निर्णय घेईन, असे राहुल गांधी म्हणाले. किशोरीलाल शर्मा हे गेल्या 40 वर्षांपासून अमेठीत काँग्रेस पक्षासाठी काम करत आहेत. त्यांचा अमेठीतील जनतेशी संबंध आहे. किशोरीलाल शर्मा हे अमेठीच्या अतिशय जवळचे आहेत, हे भाजपला कळलं नाही. यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. यूपीच्या जनतेनं यावेळी कमाल केला. यूपीने हिंदुस्थानचं राजकारण समजून, संविधानावरील धोका समजून त्याचं रक्षण केलं आहे. सर्वच राज्यांचे अभिनंदन. पण उत्तर प्रदेशचं मी विशेष अभिनंदन करतो. तुम्ही काँग्रेस पक्षाचं आणि ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा दिला. या यशात प्रियांका गांधी यांचाही मोठा वाटा आहे, असे राहुल गांधी स्पष्ट केले.