Lok Sabha Election 2024 : हा मोदी-शहांचा पराभव, महाराष्ट्राच्या जनतेनं बदला घेतला; संजय राऊत कडाडले

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपला बहुमतही मिळवता आलेलं नाही. याचा समाचार शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपला संजय राऊत यांनी सोलून काढलं. नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, असे संजय राऊत म्हणाले.

लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव केला आहे. भाजपला बहुमत मिळालेले नाही. भारतीय जनता पार्टी हरली आहे. बजरंगबली आणि प्रभू श्रीरामाच्या नावाने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे जनतेला मूर्ख बनवलं. श्रीराम, बजरंगली  भाजपसोबत नाही तर, आमच्यासोबत आहेत. अयोध्येत भाजपचा पराभव झाला. मोदींनी तिथे मोठा इव्हेंट केला होता. ध्यान केलं, चौदा दिवसांचं व्रत केलं. काल ध्यान केलं. देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदींना नाकारलं आहे. मोदींना अखेर निरोप दिला आहे. 2014 आणि 2019 मध्ये एनडीए नव्हे तर भाजपने एकट्याने बहुमत मिळवलं होतं. 2024 मध्ये भाजपला बहुमत मिळालेलं नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव आहे. राहुल गांधींचं नेतृत्व आणि राज्यांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव या सर्व नेत्यांनी जीवतोड मेहनत घेतली. मोदी-शहांचा जो अहंकार आहे, या देशाने संपवला आहे. आता मोदी-शहांची भागमभाग सुरू आहे. आमच्यासोबत या सरकार बनवू, यासाठी आता हातपाय जोडत आहेत. मी दाव्याने सांगतो मोदींचं सरकार स्थापन होत नाही. मोदींनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा, त्यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. आता हे फोडाफोडी करून सरकार बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर जनता रस्त्यावर उतरेल. हे पंतप्रधान स्वतःला परमेश्वर समजत होते, त्यांचे नाक आता कापले गेले आहे. आता कापलेलं नाक घेऊन नरेंद्र मोदी देशात फिरतील. 400 पार, 350 पार आणि 300 पारच्या घोषणा दिल्या गेल्या, पण भाजपला 250 जागाही मिळाल्या नाहीत. मुंबईने, महाराष्ट्राने मोदींना रोखलं आहे. आज संध्याकाळपर्यंत मुंबईचे निकाल पाहा, आम्ही मुंबईत 5 जागा जिंकू, असे संजय राऊत म्हणाले.

‘फोडाफोडी करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र उभा राहील’

हा मोदींचा पराभव आहे. सपशेल पराभव झाला आहे. जनतेनं नाकारलं आहे. खूप झालं आता घरी बसा, असं श्रीराम आणि बजरंगलीने म्हटलंय. आता झोळी घेऊन निघा, हाच जनादेश आहे आणि जनतेचा संदेश आहे. देशात परिवर्तन होणार आहे. या निर्णयाकडे आम्ही सकारात्मकदृष्टीने पाहतोय. एक्झिट पोल आम्हाला 100 जागाही देण्यास तयार नव्हते. ते आता सांगताहेत आमचं सरकार बनेल. राहुल गांधी नेतृत्व करतील. अनेक जागांवर मतमोजणी सुरू असून भाजपच्या आणखी जागा संध्याकाळपर्यंत कमी होतील. भाजप 240 च्याही खाली येईल. भाजपचे लोक कोणाचेच नाही. आता सरकार स्थापन करण्यासाठी अनेकांची दारं ठोठावत आहेत. पण त्यांच्यासोबत जाण्यास कोणीच तयार नाही, असा भीमटोला संजय राऊत यांनी लगावला.

Lok Sabha Election Result : वाराणसीत मोदींची घसरगुंडी, लाट ओसरली

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालने सर्वात मोठा खेला केला आहे. जिथे-जिथे मोदी-शहांनी अन्याय, अत्याचार केला आहे, ती सर्व राज्ये त्यांच्याविरोधात गेली आहेत. खास करून महाराष्ट्रात शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फोडली. महाराष्ट्राच्या जनतेनं हा बदला घेतला आहे. जेव्हा-जेव्हा अशी फोडाफोडी केली जाईल, महाराष्ट्र तुमच्याविरोधात उभा राहील, असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी केला.

‘हा पराभव नरेंद्र मोदींचाच’ 

आता हात जोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तुमचे पाया पडायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. पण नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी गप्प बसलं पाहिजे. देशाने आणि देशाच्या जनतेनं पूर्णपणे फेटाळून लावलं आहे. स्वतःला भगवान समजत होते. हे नकली भगवान आता पराभूत झाले आहेत. ज्यांना तुम्ही नकली वरसदार म्हणाले, त्यांनीच तुमचा पराभव केला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

राहुल गांधींचा परफॉर्मन्स हा मोदींपेक्षा बेस्ट आहे. राहुल गांधी यांनी शून्यातून काँग्रेस पक्षाला दीडशेपर्यंत नेलं. आणि नरेंद्र मोदींनी सव्वातीनेशवरून पक्षाला सव्वा दोनशेवर आणलं. हा पराभव नरेंद्र मोदींचाच आहे आणि नरेंद्र मोदींमुळे पराभव झाला. नरेंद्र मोदींमुळेच आम्ही पुढे गेलो. 30 प्लस जागा जिंकू, हे आम्ही निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून सांगत होतो. दहशत, पैसा याचा वापर केल्यामुळे काही जागा थोड्या मताने आम्ही गमावल्या आहेत. हे खंर आहे. भविष्यात त्या जागा आम्ही परत मिळवू. 30 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, 30 हा आकडा कायम होता. आणि आम्ही तेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत, असे संजय राऊत यांनी अधोरेखित केले. धनुष्यबाण नसल्याचाही फटका आम्हाला ग्रामीण भागात बसला. आदिवासी पाडे, गाव वस्त्यांवर धनुष्याबाण चिन्ह पोहोचलेलं आहे. त्यामुळे काही हजारांचा फटका आम्हाला प्रत्येक मतदारसंघात बसल्याचे ते म्हणाले.

Lok Sabha Election Result : पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा खेला, भाजपची दमछाक

‘सांगलीत शिवसेनेचं काम सुरूच राहील’

ही लोकशाही आहे. सांगलीची जागा शिवसेनेनं लढवली. काँग्रेसला हा आमचा निर्णय मान्य झाला नाही. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आम्हाला ज्या पद्धतीने साथ द्यायला हवी होती, ती दिली नाही. हे सत्य आहे. तरीही विशाल पाटील यांचा विजय झाला. लोकशाहीमध्ये असे जे कौल असतात ते मान्य केले पाहिजेत. विशाल पाटील हे परंपरेनं काँग्रेसच्या घराण्यातील एक नेते आहेत. ते महाविकास आघाडीसोबत राहतील. पण आम्हाला नक्कीच वेदना झाली. महाविकास आघाडीचा धर्म त्या जिल्ह्यात काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने पाळला नाही. मी वरच्या नेतृत्वाला दोष देणार नाही. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांनी प्रयत्न केले. पण तसं होऊ शकलं नाही. ठीक आहे, हा लोकांचा कौल आहे. आम्ही स्वीकारू. सांगलीत शिवसेनेचं काम सुरूच राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.