Lok Sabha Election Result : वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचा विजय ढापला, वायकरांंचा संशयास्पद विजय

वायव्य मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी विजय हुकला. मिंधे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी ‘संशयास्पद’रीत्या विजयी ठरले. मतमोजणीच्या 26 फेऱ्यांमध्ये सर्वाधिक वेळा शिवसेनेचे अमोल कीर्तिकर आघाडीवर होते. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र पोस्टल मते मोजताना कालाकांडी करण्यात आली. ऐनवेळी 111 पोस्टल मते बाद झाल्याने गणित फिरले आणि कीर्तिकर यांचा विजय हुकला.

उत्तर-पश्चिम मुंबई  या मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल किर्तीकर आणि मिंधे गटाचे ऱविंद्र वायकर यांच्यात लढत होती. मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीच्या 26 फेऱया झाल्या. त्यात एकूण 9 लाख 51 हजार 582 मते ईव्हीएमवर नोंदवली गेली. त्यात एक मताने अमोल  कीर्तिकर आघाडीवर होते. या मतदारसंघातील पोस्टल मतांची संख्या 3357 होती. त्यातील 111 मते बाद करण्यात आली होती. पोस्टल मतदान मोजणीनंतर अमोल  कीर्तिकर यांच्या एकूण मतांची संख्या 4 लाख 52 हजार 596 तर रवींद्र वायकर यांच्या एकूण मतांची संख्या 4 लाख 52 हजार 644 झाली. अवघ्या 48 मतांनी वायकर आघाडीवर होते. त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पोस्टल बॅलेटमधील बाद ठरलेल्या 111 मतांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. पडताळणीनंतर ती 111 मते बादच असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. अखेर वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

650 मतांचा घोळ; फेरमोजणी करा

निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना रीतसर पत्र लिहून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. 26 फेऱ्यांमध्ये काही मतदार यादीतील मतमोजणीमध्ये आमच्या ‘काउंटिंग एजंट’ने दिलेली संख्या व निवडणूक कार्यालयाने उपलब्ध केलेली संख्या यात सुमारे 650 मतांचा फरक आहे. या पार्श्वभूमीवर फेरमतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी अमोल कीर्तिकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा 1999-2004 सुनील दत्त (काँग्रेस)
चौदावी लोकसभा 2004-2005 सुनील दत्त ()
प्रिया दत्त 2004-2005 (काँग्रेस)
पंधरावी लोकसभा 2009- 2014 गुरूदास कामत (काँग्रेस)
सोळावी लोकसभा 2014-2019  गजानन कीर्तीकर (शिवसेना)
सतरावी लोकसभा 2019-2024 गजानन कीर्तीकर शिवसेना (आता शिंदे गट)