जिवंत असूनही मृत घोषित करण्यात आले, राजीव गांधींविरोधात लढणाऱ्याने आता मोदींविरोधात दंड थोपटले

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागले. या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मोदी वाराणसीतून निवडणूक लढणार असून त्यांच्याविरोधात यंदा जिवंत असूनही मृत घोषित करण्यात आलेल्या एका व्यक्तीने दंड थोपटले आहेत. लाल बिहारी असे त्यांचे नाव आहे.

Lal Bihari हे मृतक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते पंतप्रधान Narendra Modi यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अमिलो गावचे रहिवासी असलेले लाल बिहारी मृतक संघाच्या बॅनरवरच निवडणूक लढणार असून या निवडणुकीची तयारीही त्यांनी सुरू केली आहे.

लाल बिहारींसोबत नक्की काय घडले?

लाल बिहारी हे शेतकरी असून 1972मध्ये सरकारी बाबुंनी त्यांना कागदोपत्री मृत घोषित केले. लाल बिहारी यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांची जमीन लाटली होती. याविरोधात लाल बिहारी यांनी तहसील कार्यालय, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत धाव घेतल आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे म्हणणे ऐकूनही घेतले गेले नाही. सरकार दरबारी न्याय मिळत नाही हे पाहून वैतागलेल्या लाल बिहारी यांनी आपल्याप्रमाणेच कागदोपत्री मृत घोषित करण्यात आलेल्या लोकांना एकत्र केले आणि मृतक संघाची स्थापन केली आणि याचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. ही संघटना कागदोपत्री मृत घोषित करण्यात आलेल्यांची बाजू मांडते.

तीन वेळा लोकसभा, तीन वेळा विधानसभा

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची लाल बिहारी यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा विधानसभा निवडणूक लढली आहे. समोरील व्यक्तीसमोर आपला निभाव लागणार नाही हे माहिती असतानाही लाल बिहारी निवडणूक लढले. सरकारी बाबुंनी जिवंत व्यक्तींना मृत घोषित करून केलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे यामागील आपले उद्दिष्ट असल्याचे लाल बिहारी म्हणाले.

धडधडीत खोटे बोलून इतिहास बदलता येत नाही; राहुल गांधी यांनी भाजपला सुनावले

चित्रपटही बनला

लाल बिहारी यांच्या संघर्षमय जीवनावर ‘कागज’ हा चित्रपटही बनला आहे. तसेच ते याआधीही अनेक निवडणुका लढले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या राजीनाम्यानंतर 1988 ला अलाहाबाद मतदारसंघातून व्हीपी सिंह यांच्याविरोधात लाल बिहारी यांनी लोकसभा निवडणूक लढली होती. तर 1989 ला त्यांनी थेट राजीव गांधी यांनाच अमेठीतून आव्हान दिले होते. त्यानंतर 2004 ला ते आझमगड येथून लोकसभा लढले. तर 1991, 2002 आणि 2007 ला मुबारकपूरमधून ते विधानसभा निवडणूक लढले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)