Lok Sabha Election 2024 : वाराणसीत तृतीयपंथीयाचे नरेंद्र मोदींना आव्हान!; कोण आहे महामंडलेश्वर हिमांगी सखी? महाराष्ट्राशी आहे संबंध

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने भाजप समोर कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना एका तृतीयपंथीयाने थेट आव्हान दिले आहे. महामंडलेश्वर हिमांगी सखी या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

महामंडलेश्वर हिमांगी सखी या अखिल भारत हिंदू महासभेकडून वाराणसी मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भारत हिंदू महासभेच्या उत्तर प्रदेश शाखेने 27 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची घोषणा केली आहे. यात वाराणसी मतदारसंघातून महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्या नावाची घोषणा भारत हिंदू महासभेने केली आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी निवडणूक लढवत आहे, असे हिमांगी सखी यांनी म्हटले आहे. हिमांगी सखी यांनी यापूर्वी कधीच निवडणूक लढवलेली नाही. तृतीयपंथीयांच्या समस्या मांडण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेत तृतीयपंथीयांसाठी काही जागांचे आरक्षण असावे, अशी त्यांची मागणी आहे.

आम्ही रामाचे पुजारी, भाजप रामाचे व्यापारी! जयराम रमेश यांनी मोंदीच्या टीकेवर दिले प्रत्युत्तर

आजही तृतीयपंथीयांना भीक मागून किंवा देहविक्री करून आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. सरकारने तृतीयपंथीयांच्या प्रगतीसाठी काहीच काम केले नाही. येत्या 12 तारखेला काशीला जाऊन विश्वनाथाचे दर्शन घेणार आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे हिमांगी सखी यांनी सांगितले.

कोण आहेत हिमांगी सखी?

हिमांगी सखी या तृतीयपंथीय महामंडलेश्वर आहेत. पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये भागवत कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मराठी, गुजराती, पंजाबी, हिंदी आणि इंग्रजीत त्या भागवत कथा सांगतात. हिमांगी सखी यांनी आतापर्यंत बँकॉक, सिंगापूर आणि मॉरिशससह इतर अनेक ठिकाणी भागवत कथांचे कार्यक्रम घेतले आहेत.

मोदी, शहा यांच्या राजकीय पूर्वजांचा मुस्लिम लीगशी तर जुना दोस्ताना

तृथीयपंथीयांच्या हक्कासाठी त्या कायम आवाज उठवत आल्या आहेत. हिमांगी सखी यांची आई पंजाबी आणि वडील गुजराती होते. हिमांगी सखी यांचे बालपण महाराष्ट्रात गेले. पण आई-वडिलांच्या निधनानंतर त्या वृंदावनमध्ये गेल्या आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले. मुंबईत त्यांच्या घराजवळ इस्कॉन मंदिर होते. तेव्हापासून त्या श्रीकृष्ण भक्त आहेत.