भटकंती – कोको द मार, जगातला सर्वात मोठा नारळ 

>> जयप्रकाश प्रधान

सेशल्स हा हिंदी महासागरातील 115 लहानमोठय़ा बेटांचा समूह म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच. यातील प्राले या बेटाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील ‘व्हॅले द माय’ हे जंगल. जगातल्या या सर्वात मोठय़ा आकाराच्या नारळाची झाडे या जंगलामध्ये बघावयास मिळतात. या नारळांना ‘डबल कोको नट’ किंवा ‘कोको द मार’ म्हणतात.

जगातील सर्वात मोठा नारळ कोणत्या देशात आहे? आणि त्याचे वजन किती? तो हिंदी महासागरातील सेशल्स बेटांवर आढळतो व त्याचे वजन 15 ते 18 कि.ग्रॅ.पर्यंत असते. ‘डबल कोकोनट’ किंवा ‘कोको द मार’ (Coco de mer) म्हणून तो ओळखला जातो. सेशल्स हा हिंदी महासागरातील 115 लहानमोठय़ा बेटांचा समूह, पृथ्वीवरील अक्षरश: स्वर्ग आहे. मोरपिशी गडद निळ्या -सोनेरी रंगाचे पाणी व अतिशय स्वच्छ किनारे… यामुळे ब्रिटन, युरोपमधील पर्यटक फार मोठय़ा संख्येने येथे येतात. मी व पत्नी जयंतीने सेशल्सच्या विविध बेटांवर चांगली पंधरा दिवस मनसोक्त भटकंती केली. त्यावेळी हे अवाढव्य नारळ, त्यांची झाडे प्रत्यक्ष पाहता आली व चांगली माहितीही मिळू शकली.

येथील प्राले या बेटावर अनेक जगप्रसिद्ध बीचेस तर आहेतच, पण प्रालेचे मुख्य वैभव व आकर्षण म्हणजे येथील ‘व्हॅले द माय’ (Vallee de mai) फॉरेस्ट या संरक्षित क्षेत्राला युनेस्कोने 1983 मध्ये ‘वर्ल्ड हेरिटेज’ साइटचा दर्जा दिला आहे. वीस हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हे जंगल विस्तारलेले असून त्यातील अनेक झाडे, फळे, पक्षी अतिशय दुर्मिळ आहेत. आम्ही जवळजवळ दिवसभर या जंगलात फिरलो आणि उत्तम इंग्रजी बोलणारी, समजणारी गाईड बरोबर असल्याने चांगली माहिती मिळाली. सर्व जंगलाचे अतिशय उत्तम जतन व संवर्धन केले असून उत्कृष्ट रस्ते तयार करतानाच, जंगलाच्या मूळ नैसर्गिक रूपाला कोणतीही बाधा येणार नाही याची कसोशीने काळजी घेण्यात आली आहे.

जगातल्या या सर्वात मोठय़ा नारळाची झाडे या जंगलामध्ये बघावयास मिळतात. काही अतिशय जुनी झाडे येथे आहेत. या नारळांना ‘डबल कोको नट’ किंवा ‘कोको द मार’ म्हणतात. सुरुवातीला ते दोन नारळांचे एकत्र फळ पाहिले. 15 ते 18 कि.ग्रॅम वजनाचा तो नारळ पाहून चकितच व्हायला होते. मग झाडांच्या जवळ जाऊन, त्याला लागलेले मोठाले नारळ दाखविण्यात आले. या झाडांच्या, फळांचा इतिहासही महत्त्वाचा आहे. तीनशे-चारशे वर्षांपूर्वी हिंदी महासागरात सेशल्स बेटांच्या आसपास हे अतिप्रचंड नारळ पडलेले दिसले. दर्यावर्दीना सुरुवातीला वाटले की कदाचित ही फळे समुद्रातूनच वर आली असावीत! पण कोको द मारची जुनी झाडे शेकडो वर्षांपासूनची आहेत. 1968 मध्ये ला व्लिरुएज व ल्वारिक या बोटींमधून प्रवास करीत असलेल्या बारे याने ही फळे प्राले बेटावर आणली. त्यामुळे पहिल्या ‘कोको द मार’ नारळाचे श्रेय त्याला दिले जाते. नारळाच्या या जातीच्या झाडाची वाढ फारच हळू होते. झाडांच्या बिया खाली पडल्या की त्या रुजायला निदान तीन वर्षे लागतात. त्यानंतही झाड बरेच हळू वाढते. झाड मॅच्युअर होण्यासाठी निदान वीस ते पंचवीस वर्षे लागतात. त्याची उंची 25 मीटर्सपर्यंत वाढते. त्यानंत ते झाड नर की मादी आहे हे समजते. केवळ मादी झाडालाच फुले येतात. प्रत्यक्ष मोठा नारळ पूर्ण तयार होण्याचा कालावधी सात वर्षांपर्यंतचा राहतो. या नारळाचा आकार भला मोठा व वजन 15 ते 18 कि.ग्रॅ. पर्यंत असते. एखादे झाड चांगले सुदृढ असेल तर त्याला एकूण 110 ते 115 नारळ लागतात. झाडावरचे ते अजस्त्र नारळाचे घड बघण्यासारखे असतात. एक नारळ फोटोसाठी मी उचलून बघितला. पण खरोखरच तो उचलणे मोठे कठीण वाटले. आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 18.3 किलो ग्रॅम वजनाचा नारळ बेटावरील सेशल्स नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये पाहावयास मिळतो.

‘कोको द मार’ची झाडे ही अत्यंत दुर्मिळ व केवळ सेशल्समधील प्राले व कुरियु बेटांवरच त्यांची नैसर्गिक वाढ होते. या राष्ट्रीय संपत्तीचे अतिशय उत्कृष्ट संरक्षण व संवर्धन तेथील शासनाने केले आहे. तो नारळ फोडून त्यातील खोबरे खाण्यास, पाणी पिण्यास बंदी आहे आणि सर्वसामान्य जनतेकडूनही त्याचे उत्तम पालन केले जाते. आमच्या गाईडने गमतीने सांगितले की, `कोणीही स्थानिक नागरिक या नारळाचे झाड घराच्या परसात लावण्याचे धाडस करत नाही. कारण तो नारळ कोणाच्या डोक्यावर, अंगावर पडला तर त्याला डायरेक्ट ‘वर’ जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही!’ ‘कोको द मार’चा डबल नारळ, सेशल्सचे सुव्हिनिअर म्हणून दुकानात, हॉटेलमध्येही ठेवलेला आढळतो. ‘व्हॅले द माय’ फॉरेस्टमध्ये अत्यंत दुर्मिळ वनस्पती, सरपटणारे प्राणी, पक्षी वगैरेही पाहवयास मिळतात. त्यामुळे या सर्वांची आवड असणाऱयांना येथे फिरण्यासाठी एक दिवस कमीच पडतो. सेशल्स आयलंडस् फाऊंडेशनतर्फे या फॉरेस्टची देखरेख केली जाते आणि ही संस्था ते काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडते. त्यामुळेच तेथील झाडांचे, फळांचे संरक्षण, संवर्धन तसेच संशोधन शिक्षण आणि त्याचबरोबर पर्यटन या सर्वांचा व्यवस्थित समन्वय साधण्यात येत आहे.