सरकार स्थापनेच्या हालचालींबरोबरच भारतीय जनता पक्षातही अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. मुंबईतील भाजपच्या आमदारांची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झाली. त्यात मुंबईचा नवा अध्यक्ष नेमण्यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे.
नव्या सरकारमध्ये विद्यमान मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा किंवा मनोज कोटक यांना नेमले जाण्याची शक्यता आहे. लोढा यांना मंत्रीपदावर अडकून न ठेवता आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने मुंबई अध्यक्षपदाची धुरा द्यावी अशी आज चर्चा झाली.
खासदारकी न मिळाल्याने मनोज कोटक हेसुद्धा रिकामी आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतीही जबाबदारी नसल्याने त्यांना मुंबईचा अध्यक्ष बनवले जावे असेही मत आमदारांनी मांडले. त्यावर आता पुढील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे सांगण्यात आले.