लोकल रेल्वेमधील बॉम्बस्फोट प्रकरण, 18 वर्षांपासून तुरुंगात असलेला आरोपी निर्दोष; उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचा दावा

मुंबईत झालेल्या लोकल रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी आपल्या अशिलाचा कोणताही संबंध नाही तो निर्दोष असून गेली 18 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत आहे, असा युक्तिवाद या प्रकरणातील आरोपीने आज उच्च न्यायालयात केला.

मुंबईच्या उपनगरी लोकल रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले. दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईम बॉम्ब ठेवत मुंबई लोकलमध्ये 11 मिनिटांत 7 बॉम्बस्फोट घडवले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 13 पैकी 5 आरोपींना फाशीची व उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या दोघांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करत निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ज्येष्ठ वकील एस मुरलीधर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, तपास यंत्रणा दहशतवादाशी संबंधित प्रकरणांचा तपास करताना जातीय पक्षपात करत आहे. एटीएस व इतर तपास यंत्रणा आरोपींचा छळ करून आरोपींकडून कबुली जबाब नोंदवत आहेत.