एसी ट्रेनमध्ये अडकले प्रवासी; गार्ड दरवाजा उघडायला विसरला

मध्य रेल्वेवरील टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमध्ये शनिवारी सकाळी शेकडो प्रवासी अडकून पडले. दादर स्थानकात लोकल आली असता लोकल व्यवस्थापक (गार्ड) दरवाजे उघडायला विसरला. त्यामुळे प्रवासी लोकलमध्येच अडकले.  टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकल शनिवारी सकाळी 8.33 वाजता सुटली. ही लोकल सकाळी 10.05 वाजता दादर स्थानकात पोहोचली. लोकल स्थानकात एक मिनिट थांबली, मात्र दरवाजे उघडलेच नाहीत.

लोकल पुढील परळ स्थानकात थांबल्यानंतर प्रवासी  उतरले. गार्ड गोपाळ ढाके यांनी दादरमध्ये वातानुकूलित लोकलचा दरवाजा उघडला नाही. याप्रकरणी गोपाळ ढाके यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.