
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील सुमारे 22 हजार युवा फिक्स टर्म कंत्राटी कामगारांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि न्याय्य हक्कासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे बुधवार 23 एप्रिल रोजी दुपारी 12ः30 वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील फिक्स टर्म कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात व्यवस्थापनाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला शिवसेना नेते – आमदार अॅड. अनिल परब, महासंघाचे कार्याध्यक्ष आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर व विभागप्रमुख सोमनाथ सांगळे हे संपूर्ण ताकदीने उपस्थित राहणार आहेत. विभागातील शाखांमधून शिवसैनिक व महासंघाशी संलग्न सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी आयटीसी हॉटेलसमोर, मेडिकॉन भवन, सहार पोलीस स्टेशनजवळ, एअरपोर्ट गेट नंबर 5, सहार येथे उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.