लिव्हिंगस्टोनने स्टार्कच्या शेवटच्या षटकात चोपल्या 28 धावा

लियाम लिव्हिंगस्टोनने मिचेल स्टार्कच्या डावातील शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करताना 6, 0, 6, 6, 6, 4 अशा तब्बल 28 धावा चोपून काढल्या. त्यामुळे स्टार्क हा सर्वात महागडा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. या झंझावातामुळे इंग्लंडने चौथ्या वन डेत ऑस्ट्रेलियासमोर 39 षटकांत 313 धावांचे जबरदस्त आव्हान दिले. या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने पुढे असून चौथा सामना सहज जिंकून इंग्लंड बरोबरी साधण्याच्या मार्गावर आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे 39 षटकांचा सामना करण्यात आला. या डावात बेन डकेट (63), हॅरी ब्रूक (87), जॅमी स्मिथ (39) यांच्या खेळीनंतर लिव्हिंगस्टोनच्या 27 चेंडूंतील 3 चौकार आणि 7 षटकारांच्या झंझावाताने इंग्लंडला 312 ही मजल मारून दिली. या डावात इंग्लंडच्या फलंदाजाने 25 चौकार आणि 12 षटकारांची आतषबाजी केली.