मृत्यूच्या दाढेतून चिमुकली दीपिका सुखरूप परतली, शिक्षिकेच्या मारहाणीमुळे सवा महिना रुग्णालयात

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने जोरात कानफटात मारल्याने गंभीररीत्या जायबंदी झालेली दहा वर्षांची चिमुकली विद्यार्थिनी दीपिका पटेल ही अखेर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतली आहे. तब्बल 22 दिवस कृत्रिम श्वसन यंत्रणेवर असलेल्या दीपिकावर विविध शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले आहेत.

नालासोपारा पूर्व येथील ओस्वाल नगरीत अंबाराम पटेल हे किराणा दुकान चालवतात. त्यांची दहा वर्षांची मुलगी दीपिका पाचवीत आहे. याच परिसरात असलेल्या हिना क्लासेसमध्ये दीपिका खासगी शिकवणीसाठी जाते. 5 ऑक्टोबर रोजी ती वर्गात मस्ती करते म्हणून शिक्षिका रत्ना सिंग (20) हीने दीपिकाच्या उजव्या कानाखाली जोरदार थप्पड मारली. त्यामुळे तिच्या कानातील कर्णफुलाचा मागील भाग कानाच्या पाठीमागील बाजूस घुसून गंभीर दुखापत झाली. या मारहाणीमुळे दीपिकाच्या कानाला सूज आली आणि तिचे तोंडही बंद झाले.

दीपिकाला आधी विरारच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ती तब्बल 22 दिवस कृत्रिम श्वसन यंत्रणेवर मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या श्वसननलिकेसह मेंदूला इजा झाल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी विविध शस्त्रक्रिया केल्या आणि तिचे प्राण वाचवले. तब्बल सवा महिना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज दीपिका परतली आहे. ती आता बोलू शकते, खाऊ शकते ही केवळ परमेश्वराची कृपा आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाचे वडील अंबाराम यांनी व्यक्त केली.

कुटुंब कर्जबाजारी

दीपिकाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाल्याने सर्वसामान्य असलेले पटेल कुटुंबीय कर्जबाजारी झाले पण तिला मारहाण आहे. माझी मुलगी वाचली करणारी शिक्षिका अद्याप मोकाट आहे. तिच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.