महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे

राज्य सरकारने अखेर मंत्र्यांच्या खाते वाटपाच्या महिनाभरानंतर 37 जिल्हय़ांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून मस्साजोगप्रकरणासह गुन्हेगारीमुळे गाजत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर मुंबई शहर आणि ठाणे जिह्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. मुंबईच्या उपनगरासाठी प्रथमच दोन पालकमंत्री नियुक्त केले असून आशीष शेलार व मंगलप्रभात लोढा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रायगडमध्ये आदिती तटकरे, गोगावलेंना पुन्हा ठेंगा

रायगड जिह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात स्पर्धा होती. रायगडचे पालकमंत्री पद मलाच मिळणार अशी घोषणा भरत गोगावले यांनी आधी स्वतःच जाहीर करून टाकली होती. पण अखेर या जिह्याच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची नियुक्ती झाली आहे.

प्रथमच दोन पालकमंत्री

एका जिह्याला दोन पालकमंत्री प्रथमच नेमण्यात आले आहेत. मुंबईच्या उपनगरासाठी आशीष शेलार पालकमंत्री आणि मंगलप्रभात लोढा यांची सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे, तर कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असतील तर सहपालकमंत्री म्हणून आशीष जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.