
विदेशी बनावटीच्या ‘इंग्लिश’ दारूचे स्टिकर बाटल्यांवर लावून त्यात गोव्याची दारू भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे टीमने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पथकाने सापळा लावून सिमेंटच्या महाकाय मिक्सरवर छापा घातला. तेव्हा या मिक्सरमधून सिमेंट नव्हे तर चक्क दारूच्या शेकडो बाटल्या निघाल्या. त्याची किंमत 66 लाख इतकी आहे. या कारवाईत 595 बॉक्स जप्त करण्यात आले असून मोहन जोशी या वाहनचालकाला अटक केली आहे.
गोवा राज्यातून मद्याची वाहतूक होणार
असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार बेलापूर सीबीडी डी. वाय. पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री सवाएक वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना संशयित दहाचाकी सिमेंट मिक्सर या वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता परराज्यातील हिंदुस्थानी बनावटीचे विदेशी मद्याचे बॉक्स आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या आधीही तस्करी
कोणाला संशय येऊ नये म्हणून मिक्सरमधून मद्याची वाहतूक करणे सोपे होते. अटक आरोपीने या आधी दोनवेळा हा प्रकार केला असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान सिमेंट मिक्सरमध्ये 595 विदेशी मद्याचे बॉक्स असून एकूण 66 लाख 39 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात राज्य उत्पादन शुल्क ठाण्याच्या भरारी पथकाला यश आले आहे.