
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ घातला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आकाशातील वीज कहर बनून पडत असून आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकं जखमी झाले आहेत.
बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वीज पडून 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या नैसर्गिक घटनांवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशमधील 20 जिल्ह्यांमध्ये वीज पडून 43 लोकांचा मृत्यू झाला, तर काही लोकं जखमी झाले आहेत. सर्वाधिक मयत प्रतापगढ जिल्ह्यातील असून येथे वीज पडून 12 जणांचा मृत्यू झाला. तर सुल्तानपूर येथील 7, चंदोली येथील 6, मैनपुरी येथील 5 आणि प्रयागराज येथील 4 जणांचा यात समावेश आहे. यासह औरैया, देवरिया, हाथरस, वाराणसी आणि सिद्धार्थनगर येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला. प्रशासनाने सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
झारखंडमध्येही मे-जून महिन्यात वीज पडून 32 जणांचा, तर जुलै महिन्यात 3 लोकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही विजेचा कहर सुरू असून येथे मुर्शिदाबाद जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेच्या परिसरातील झाडावर वीज पडून 15 शाळकरी मुलं जखमी झाले.
एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, डोमकलमधील भागिरथपूर हायस्कूलमध्ये इमारतीच्या बाजूला असणाऱ्या झाडाजवळ मुलं उभी होती. त्याचवेळी आकाशातील वीज कोसळली आणि मुलं जखमी झाले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना मानसिक धक्का बसला असून डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.