परतीच्या पावसाचा फटका! कांदा 70 रुपये किलो तर, हिरव्या भाज्यांचे भाव भिडले गगनाला

परतीच्या पावसासोबतच हिरव्या भाज्यांच्या भावातसुद्धा वाढ झाली आहे. यंदा देशभरात चांगला पाऊस पडतोय. पण परतीच्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. कांदा, टोमॅटो तसेच हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

ईटीच्या वृत्तानुसार, मेट्रो शहरांतील बहुतेक किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटोचे भाव 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. हिरव्या भाज्यांचे भावही वाढले आहेत. मोठ्या शहरांमध्ये शिमला मिरची आणि पालक यासारख्या हिरव्या भाज्यांचे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वयंपाकघराचे बजेट सांभाळणे कठीण होत आहे. खरे तर दरवर्षी पावसाळ्यात या महिन्यात भाज्यांचे भाव वाढलेले दिसून येतात. नंतर त्यांच्या किमती हळूहळू कमी होतात. कांद्याच्या चढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 5 सप्टेंबरपासून प्रमुख शहरांमध्ये सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू केली आहे. याअंतर्गत 35 रुपये किलो या सवलतीच्या दरात कांदा लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे.

कांदा, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे देशाच्या अनेक भागात पडणारा पाऊस आहे. आशियातील सगळ्यात मोठी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी प्रमुख भाजीपाला उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे भाजीपाला व फळ बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे पावसामुळे रस्ते खराब झाल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.