मागील काही दिवसांपासून रक्त तुटवड्याची भीषण परिस्थिती असताना, काही रक्तपेढ्यांनी नियमांचे उल्लंघन करत परराज्यात रक्त आणि रक्तघटकांची विक्री केल्याचे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईत उघडकीस आले आहे. या कारवाईत एफडीएने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तर, 32 रक्तपेढ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
दिवाळीनंतर पुणे विभागात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. असे असताना काही रक्तपेढ्या नियमांचे उल्लंघन करत रक्त आणि त्यातील घटक परराज्यात पाठवत असल्यासंदर्भातील तक्रारी एफडीएला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एफडीएकडून या कालावधीत पुणे विभागातील सर्व रक्तपेढ्यांनी परराज्यात पाठवलेल्या रक्तपिशव्या आणि रक्त घटकांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर एफडीएने रक्तपेढ्यांची तपासणी करण्याची परवानगी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडे मागितली. त्यानुसार, तपासणी आराखडा तयार केल्यानंतर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवत पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील 81 रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर, एका रक्तपेढीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच 32 रक्तपेढ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. एफडीएतर्फे राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचे अधिकारी, आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचा समावेश होता. या मोहिमेअंतर्गत रक्तपेढ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करणे, रक्त संकलन आणि वितरण नियंत्रित करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रक्तपेढ्यांनी रक्त जमा करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कोणी रक्ताचा व्यापार करू नये. रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारचे आमिष देऊ नये.
गिरीश हुकरे, सहआयुक्त एफडीए पुणे विभाग