एलआयसी आता आरोग्य विमा क्षेत्रात उतरणार; 31 मार्चपर्यंत होणार घोषणा, कंपनीचे नावही जाहीर करणार

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी ‘एलआयसी’ लवकरच आरोग्य विमा क्षेत्रात उतरणार आहे. त्यासाठी एलआयसी एका स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीत भागीदारी खरेदी करणार आहे. याबाबतची घोषणा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस होईल, असे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले. मात्र एलआयसी नेमकी कोणत्या आरोग्य विमा कंपनीशी भागीदारी करणार आहे, त्या कंपनीचे नाव सिद्धार्थ मोहंती यांनी उघड केले नाही.

मुंबईत गुंतवणूक तज्ञांच्या जागतिक परिषदेला संबोधित करताना  सिद्धार्थ मोहंती म्हणाले, आरोग्य विमा कंपनीसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यावर आहे. आरोग्य विमा क्षेत्रात उतरणे ही एलआयसीसाठी ‘नॅचरल चॉइस’ आहे. या प्रक्रियेच्या मंजुरीला वेळ लागतोय. पण मला आशा आहे की, या वर्षी 31 मार्चच्या आत याबाबत निर्णय होईल. ज्या आरोग्य विमा कंपनीचा एलआयसी विचार करत आहे, त्या कंपनीत एलआयसीची जास्त भागीदारी नसेल.

चालू आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतच एलआयसीने आरोग्य विमा क्षेत्रात पाऊल टाकण्याचे सूतोवाच दिले होते. आता आर्थिक वर्षाच्या अखेरीस एलआयसीची वाटचाल त्या दिशेने होण्याचे संकेत आहेत.

तसे पाहिले तर सध्या सात स्वतंत्र आरोग्य विमा पंपन्या आहेत. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स, कार हेल्थ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्स, नारायण हेल्थ इन्शुरन्स आणि गॅलेक्सी हेल्थ इन्शुरन्स. त्यापैकी एका कंपनीत एलआयसी भागीदारी करणार आहे. ती कंपनी कोणती ते लवकरच समजेल.

एलआयसी आता आरबीआयसोबत 50 आणि 100 वर्षांचे बॉण्ड आणण्याच्या तयारीत आहे. सध्या देशात 20, 30, 40 वर्षांचे बॉण्ड उपलब्ध आहेत.