राज्यात पुन्हा महायुतीचे असंवैधानिक सरकार सत्तेत आले तर राज्य पुन्हा अधोगतीला जाईल. राज्यघटना धोक्यात येईल, सामान्यांचे आयुष्य आणखी मुश्कील होईल. म्हणून या महायुतीचा पराभव करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा निर्धार शिवसेना भवन येथे आज झालेल्या रिपब्लिकन एकता आघाडीच्या बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे रिपब्लिकन एकता आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीला सत्तेवर आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. प्रस्थापित रिपब्लिकन नेत्यांनी आंबेडकरी विचारांशी बेइमानी केली आहे. त्यामुळे या नेत्यांना या निवडणुकीत धडा शिकवला जाईल. रिपब्लिकन एकता आघाडी समाजाच्या मूलभूत प्रश्नांवरून महाविकास आघाडीसोबत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, असेही मान्यवरांनी सांगितले. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विजय कदम, एकता आघाडीचे प्रमुख अर्जुन डांगळे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, लोकमोर्चाचे प्रकाश हिवाळे, राष्ट्रीय जनशक्ती मोर्चाचे रवी गरुड, दलित पँथरचे सुरेश केदारे, रिपब्लिकन जनशक्तीचे मनोज बागूल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मिलिंद सुर्वे, स्वाभिमानी रिपब्लिकन युवाचे भगवान गरुड, स्वारीप युथचे सागर संसारे आदी उपस्थित होते.