ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने होत असल्याचा डांगोरा ठाणे महापालिका वारंवार पिटत असते, पण महापालिकेच्या हद्दीतच असलेल्या दिवा शहरातील साबे गावच्या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर संपूर्ण चिखल पसरला असून हा महापालिकेचा रस्ता आहे की एखाद्या खेडेगावातील, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. या रस्त्यावरून गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक कशी काढणार, असा सवाल करण्यात येत असून गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी तरी रस्ता होऊ द्या.. अशी मागणी भक्तांनी महापालिकेकडे केली आहे.
साबे गाव येथे जयराम पाटील गणेश विसर्जन घाट असून तो नागरिकांच्या दृष्टीने सोयीचा आहे. साबेसह साबे रोड, कोकण रत्न, साळवी नगर, टाटा रोड आदी परिसरातील गणेशभक्त विसर्जनासाठी येथे येतात. मात्र तो रस्ता चिखलमय असल्याने तातडीने त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी प्रभाग समितीकडे एक महिन्यापूर्वी केली होती. त्याशिवाय विजेची व्यवस्था, निर्माल्य कलश, कर्मचारी आदींचीही मागणी करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली आहे.
तीन किलोमीटरची पायपीट
अनेक गणेश बाप्पांना लांब दातिवली तलाव तलावांवर पायपीट करून दोन ते तीन किलोमीटर किंवा फडके पाडा येथील जावे लागत आहे. तरी साबे गावातील चिखलमय रस्ता सुस्थितीत करावा, अन्यथा गणेशभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी दिला आहे.