
अगोदर छगन भुजबळ आमच्याबद्दल बोलायचे, आता प्रवीण दरेकर बोलतात. भुजबळ आणि दरेकर यांची भाषा एकच आहे. माझे फक्त उपोषण संपू द्या, एकेकाचा हिशेब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पाचव्यांदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली. अगोदर छगन भुजबळ बोलायचे, आता त्यात प्रवीण दरेकर यांची भर पडली आहे. दोघांची भाषा एकच आहे. फक्त उपोषण संपू द्या, एकेकाचा हिशेब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
माध्यमात बोलण्यापेक्षा चर्चेला या…
मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. हा विषय माध्यमात बोलण्यासारखा नाही. माध्यमात बोलून त्यावर मार्ग निघणार नाही. शंभुराज देसाई सरकार चालवतात. मी इकडे बोलायचे, त्यांनी तिकडे बोलायचे. त्यापेक्षा आंतरवालीत या, चर्चा करा आणि मार्ग काढा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकतात
मराठा आरक्षण फक्त मुख्यमंत्रीच देऊ शकतात. पण हे आरक्षण हालअपेष्टा होण्याच्या अगोदर द्या, असे मनोज जरांगे म्हणाले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यात एसईबीसी, कुणबी आणि ईडब्ल्युएस हे तीनही पर्याय खुले ठेवण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.
अशक्तपणा वाढला, रक्तदाबही कमी
उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती अधिक खालावली. आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत त्यांचा रक्तदाबही कमी झाल्याचे दिसून आले. वैद्यकीय पथकाने त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला, मात्र जरांगे यांनी तो धुडकावून लावला.