
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी आणि रात्री बिबट्या दिसल्याने प्रवाशांमध्ये आणि विमानतळाशेजारील स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. नवीन टर्मिनलपासून जवळच्या अंतरावर बिबट्या दिसल्याने विमानतळ प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाले असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. विमानतळ परिसरात वन्यप्राण्यांच्या वावराबाबत चर्चा करण्यासाठी पुणे विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाल्याच्याच दिवशी हा प्रकार घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सोमवारी रात्री बिबट्या नवीन टर्मिनलपासून सुमारे 800 मीटर आणि धावपट्टीपासून 500 मीटर अंतरावर दिसला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश वरक यांनी सांगितले की, बिबट्या विमानतळाच्या एअरसाईडवर, म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रात दिसला आहे. आम्ही कॅमेरा ट्रॅप बसवले असून, मंगळवारी तो पकडण्याची आशा आहे. वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे.
विमानतळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा सातत्याने वावर असतो, ज्यामुळे बिबट्यासारखे वन्यप्राणी आकर्षित होऊ शकतात. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, विमानतळ प्रशासनाने याबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
बिबट्या प्रतिबंधित क्षेत्रात दिसला असला तरी, विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले की, याचा लँडिंग आणि टेक-ऑफवर कोणताही परिणाम झालेला नाही. तरीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.