निसर्गरम्य खारघरच्या टेकडीवर फिरण्यासाठी दर शनिवार, रविवारी तरुण-तरुणींची तसेच नागरिकांची गर्दी होते. मात्र जरा सावधान… या टेकडीच्या मार्गावर बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या आहेत. त्यामुळे टेकडीवर बिबट्या आला रे.. अशी भीती निर्माण झाली असून त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. एवढेच नव्हे तर वनखात्याच्या १५ जणांची टीम या बिबट्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
खारघर टेकडीवरील हिरवाई तसेच येथील आल्हाददायक वातावरण नागरिकांना नेहमी भावते. त्यामुळे शहरी वातावरणापासून थोडे दूर जाऊन शांतता मिळवण्यासाठी अनेक जण या टेकडीची वाट धरतात. पण हीच वाट आता बिबट्याच्या भीतीने अडवली गेली आहे. वनविभागाच्या टीमने काही दिवसांपूर्वीच परिसरात सर्वेक्षण केले होते. त्यावेळी रस्त्यावर बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत तातडीने कार्यवाही सुरू केली आहे.
शनिवारी मध्यरात्री फणसवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले होते. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी वनखात्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली. तब्बल तीन दिवस त्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्याला पकडण्यासाठी आता ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
रुग्णवाहिका तैनात
ज्या ठिकाणी बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले त्या दहा किमीच्या परिसरावर वॉच ठेवण्यात आला आहे. त्यासाठी स्थानिक तरुणांचीदेखील मदत घेण्यात येत असून आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एक रुग्णवाहिकादेखील तैनात केली आहे.
खारघर टेकडीच्या वाटेवर पाऊलखुणा आढळून आल्यामुळे आतापर्यंत दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच टीमतर्फे सर्वेक्षणदेखील सुरूच ठेवण्यात आले आहे. लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात आम्हाला यश येईल अशी खात्री आहे. – गजानन पांढरपट्टे, परिक्षेत्र वनाधिकारी, पनवेल