बिबट्यामुळे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

मैसूरच्या इन्फोसिस कॅम्पसमध्ये मंगळवारी बिबट्या दिसला.  त्यामुळे कर्मचारी आणि ट्रेनींमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आदेश काढला, तसेच ट्रेनींसाठी सुट्टी जाहीर केली. त्यामुळे वर्षाच्या अखेरच्या दिवशी इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागले.

मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला. दीडशे एकर परिसरात बिबट्या असल्याच्या वृत्ताला वन अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी टास्क फोर्स कामाला लागले. पहाटे 4 वाजल्यापासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्याच वेळी कॅम्पसमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली. कुणालाही कॅम्पसमध्ये सोडू नये, अशा कडक सूचना सुरक्षा पथकाने दिल्या. मैसूरच्या इन्फोसिस ग्लोबल एज्युकेशन सेंटर येथे 4 हजार ट्रेनी आहेत. त्यांनाही पुढील सूचना येईपर्यंत हॉस्टेल रुममध्ये राहण्यास सांगण्यात आलेय. कॅम्पसमधून कुणी बाहेर पडू नये असे सांगण्यात आले.

एचआरने पाठवला अर्जंट ई-मेल

इन्फोसिसच्या एचआर टीमने इंटरनेट ई-मेल पाठवून सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मंगळवारी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. कुणालाही कॅम्पसमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे सांगितले. प्रशिक्षणार्थींनाही आपल्या हॉस्टेलमध्ये थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज सेल्फ स्टडीजचे निर्देश दिले. इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये याआधी 2011 सालीदेखील बिबट्या दिसला होता.