अंबड फाट्यावर कोल्हार घोटी राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू

अकोले तालुक्यातून वनपरिक्षेत्र व मानवी वस्तीत बिबट्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अभयारण्यात खाद्य मिळत नसल्याने खाद्याच्या शोधात बिबट्यांचा मानवी वस्तीत संचार वाढत आहे. अभयारण्यातून मानवी वस्तीकडे येताना बिबट्याने अनक दुचाकीवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, अकोले शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरील अंबड गावच्या हद्दीतील कोल्हार घोटी राज्यमार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मृत बिबट्या नर असून अंदाजे दोन वर्ष वयाचा आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

अंबड फाट्यावर कोल्हार घोटी राज्यमार्गालगत रस्त्यावर एका बिबट्यांचा मृतदेह अंबडमधील ग्रामस्थांना आढळला. त्यांनी प्राणिमित्रांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. हा प्रकार खरोखरच अपघाताचा आहे की इतर वन्य प्राण्याने बिबट्यावरच हल्ला चढवला किंवा बिट्याला ठार करन त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकत अपघाताचा बनाव रचला, याचा तपास करण्यात येत आहे. या घटनेत वनविभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे काय, याचाही शोध घेण्याची मागणी प्राणिमात्रांकडून होत आहे. वनविभागामार्फत याची चौकशी करण्यात येत आहे.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॅा. राजेंद्र भांगरे यांनी सुगाव बुद्रुक रोपवाटिकेत केलेल्या शवचिकित्सेत मृत बिबट्याच्या डोक्यास व बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यामुळे हा बिबट्या अपघातात ठार झाला असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर येत आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांचा शोध वनविभागाकडून घेण्यात येत आहे. वनविभागामार्फत मृत बिबट्यावर सुगाव बुद्रुक येथील रोपवाटिकेत मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर अग्निसंस्कार करण्यात आले, अशी माहिती अकोले वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली.