
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जाळीच्या मळ्यात मागील 7 दिवसांपासून हुलकावणी देत असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी ही माहिती दिली.
जाळीचा मळा या परिसरातील शुभम बळीराम मेंगडे यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या 7 दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. परंतु बिबट्या सातत्याने हुलकावणी देत होता. अखेरीस रविवारी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. र
विवारी सकाळी 6 वाजता अक्षय वळसे, अमीर वळसे, दत्ता गायकवाड व संतोष टेमकर यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र वळसे पाटील व रामदास वळसे पाटील यांना माहिती दिली. त्यांनी वन विभागाशी संपर्क केले असता वनपाल प्रदिप कासारे, वनरक्षक बी. एच. पोत्रे, रेस्क्यू टीम मेंबर मनोज तळेकर, मिलिंद टेमकर, ऋषिकेश कोकणे, भाऊसाहेब हांडे, दशरथ मेंगडे, दत्तात्रय राजगुरू यांनी धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. या वेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले.
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असावा असे विकास वळसे व समीर मेंगडे या स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पकडलेला बिबट्या हा पाच वर्षाचा नर असून तो जास्त आक्रमक दिसून येत आहे व त्याने पिंजऱ्याला वारंवार धडका दिल्यामुळे त्याच्या नाकाला किरकोळ जखम झाली असल्याचे रेस्क्यू टीम मेंबर डॉ. अतुल साबळे यांनी सांगितले. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.