
खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील बेल्हे-जेजुरी महामार्गावरील धुमाळस्थळ येथे मंगळवारी साधारण रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या वाढदिवसासाठी वडिलांबरोबर केक आणायला चाललेल्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले आहे. सदर मुलीला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करून तिची स्थिती स्थिर असल्याने तिला रात्री घरी सोडले, अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.
सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळ्यातील मंगेश लंघे हे आपली मुलगी वैष्णवी लंघे (वय 13) हिचा वाढदिवस असल्याने बेल्हे-जेजुरी रस्त्याने धुमाळ स्थळमार्गे लोणी येथे केक आणायला चालले होते. यावेळी बिबट्याने मोटारसायकलवर हल्ला केला. मोटारसायकल वेगात असल्याने बिबट्याच्या पंजाने मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या वैष्णवीच्या पायाला बिबट्याने पंजाने हल्ला केल्याने मोठी जखम झाली.
या वेळी मंगेश शिंदे यांनी चालू गाडीवर आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. याच वेळी वनविभागाची गाडी या परिसरात गस्त घालत होती. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लंघे यांना धीर दिला व लोणी येथे दवाखान्यात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार केल्यावर वैष्णवीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी वैष्णवीची भेट घेऊन तिला व तिच्या वडिलांना धीर दिला.