कुत्ता गोलीवरून फुलले विधानसभेत हास्यकारंजे; मुद्दा अंमली पदार्थ आणि खाद्यपदार्थातील भेसळीचा

vidhansabha

विधानसभेत आज कुत्ता गोलीवरून हास्यकारंजे फुलले. प्रश्न होता अमली पदार्थांचा, पण त्याच्या कुत्ता गोली या नावावरून अध्यक्षांसह सर्वपक्षीय आमदारांनी हलकेफुलके विनोद फेकत कामकाजाला रंगत आणली. त्यातूनच केवळ कुत्ता गोलीच नव्हे तर कुत्ती गोलीही असते याची माहितीही सभागृहाला मिळाली.

आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत मालेगावमधील अमली पदार्थांची विक्री आणि खाद्यपदार्थातील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला होता. अमली पदार्थ भावी पिढीला उद्ध्वस्त करतील, असे ते म्हणाले. अमली पदार्थांमध्ये त्यांनी कुत्ता गोलीचा उल्लेख करताच ही कुत्ता गोली काय प्रकार आहे याबद्दल आमदारांची जिज्ञासा वाढली.

कुत्ता गोली खाल्ल्याने नशा चढून माणूस कुत्र्यासारखा करतो, असे भाजपा आमदार सुनील राणे म्हणाले. त्यावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी, ये कुत्ता गोली क्या है असा सवाल अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना केला. त्यानंतरही आमदारांमध्ये कुजबूज सुरू असल्याचे पाहून आधी माणसांच्या गोळय़ांवर बोलूया, असे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्राम यांना उत्तर देण्यास सांगितले.

अत्राम यांनी त्यानंतर हिंदीमध्येच प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली. हिंदीमध्ये का बोलताय अशी विचारणा झाल्यावर, जो भाषा मे प्रश्न पूछा जायेगा उसीमे जबाब दूंगा. गोंडी मे, माडिया मे, तेलुगू मे, अंग्रेजी मे भी दे सकता हू, असे ते म्हणाले. संस्कृत मे दे सकते है क्या, असे कुणीतरी विचारताच, मुझे संस्कृत नही आती मगर फ्रेंच भाषामे दे सकता हूं, असे अत्राम म्हणाले. त्यावर गमतीने हस्तक्षेप करत अध्यक्ष नार्वेकर यांनी, मै इजाजत नही दूंगा, जो भाषा अधिकृत है उसीमे जबाब देना पडेगा, असे म्हणताच हशा पिकला.

मालेगावातून 12535 कुत्ता गोली जप्त करण्यात आल्या असून 13 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री अत्राम यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांनी बोलायला उभे राहत, कुत्ता गोलीप्रमाणे कुत्ती गोलीही असते याबद्दल मंत्र्यांना माहिती आहे का, असे विचारताच पुन्हा सभागृह आश्चर्यचकित झाले. त्यावर देशमुख यांनीच, कुत्ता गोली स्ट्राँग असते आणि कुत्ती गोली माईल्ड असते, असे स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रात सर्व अमली पदार्थ परराज्यांतून नागपूरमार्गे येत असल्याने नागपूरमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. मंत्री अत्राम यांनी अप्राझोराम या गोळीलाच कुत्ता गोली म्हणतात असे स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात गृह खात्याशी चर्चा केली जाईल तसेच आवश्यक त्या ठिकाणी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची कार्यालये सुरू करण्याची शिफारस केली जाईल, असे त्यांनी सांगितले.