दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन

कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीशी प्रदीर्घ काळ लढा देणारे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

एकेकाळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या जीवघेण्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणारा हा दिग्गज फलंदाज जीवनाची लढाई आज हरला. साधारण 1970-80 च्या दशकात हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार सुरू होते. माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्यासारख्या सहकाऱयांनी बीसीसीआयकडे गायकवाड यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली होती.

गायकवाड यांनी 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. 1975 आणि 1979 च्या वर्ल्ड कपमध्येही ते टीम इंडियाचा भाग होते. गायकवाड यांनी 40 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वेत्तम धावसंख्या 201 होती, जी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केली होती. गायकवाड यांनी 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं, ज्यात त्यांच्या नावावर 20.69 च्या सरासरीने 269 धावा आहेत.

यशस्वी गुरू
1997 ते 1999 आणि पुन्हा 2000 मध्ये त्यांनी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. ते प्रशिक्षक असताना 1998 मध्ये शारजा येथे ऑस्ट्रेलियाला नमवून हिंदुस्थानने तिरंगी मालिका जिंकली होती. अनिल पुंबळेने पाकिस्तानविरुद्ध कसोटी डावात 10 गडी गारद केले होते तेव्हा गायकवाड हेच कोच होते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम फेरीत धडक देणाऱया संघाचेही गायकवाड हेच गुरू होते.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे अंशुमन गायकवाड नेहमीच स्मरणात राहतील. त्यांनी अनेक क्रिकेटपटूही घडवले, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. माजी कर्णधार सौरव गांगुली तसेच बीसीसीआयनेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.