>> अॅड. संजय भाटे
प्रश्न : मी माझ्या आई-वडिलाचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्यावर आई-वडिलाची संपूर्ण जबाबदारी आहे. माझे आई-वडील वयस्कर आहेत. वया बरोबर येणाऱ्या व्याधी, पथ्यपाणी, डॉक्टरांच्या वाऱ्या कराव्या लागतात. मी माझ्या आई-वडिलांबरोबर कायम राहणार असल्याचे बायकोला लग्नाअगोदर स्पष्ट सांगितले होते. तरीही बायकोने आई-वडिलांना सोडून वेगळे राहण्याचा हट्ट धरला. मी त्यास नकार दिला. त्यामुळे तिने माझ्यावर घरगुती हिंसाचाराची केस केली. कारण काय तर मी तिला वेळ देत नाही. त्यात माझ्यासह माझे आई-वडील, माझे दोन काका, काकी, माझी मावशी, तिचे यजमान अशा साऱ्यांची नावे जोडली आहेत. तिच्या या सर्व वागण्यामुळे माझे अतोनात नुकसान झाले. कोर्ट-कचेऱ्यांत माझा जो वेळ वाया जाईल, पुन्हा लग्न करून आयुष्याची घडी बसवणे कठीण आहे. त्यात तिने पोटगी मागितल्याने होणारे आर्थिक नुकसान वेगळेच. मी तिच्यावर काही केस करू शकतो का?
तुमच्या आई-वडिलांच्या भरणपोषणाची जबाबदारी हे तुमचे नैतिक, सामाजिक व कायदेशीर कर्तव्य आहे व त्याबाबत तुमची ठाम भूमिका योग्य आहे. तुमच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार अधिनियमा अंतर्गत तुमच्या विरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही या विवाह संबधाच्या भवितव्या बाबत काय ठरविले आहे ते नमूद केले नाही.
न्यायालयात हजर होऊन ते प्रकरण सलोखा व मध्यस्थीसाठी पाठविण्यासाठी न्यायालयास विंनती करावी. त्यानुसार प्रकरण मध्यस्थाकडे गेल्यानंतर तेथे होणाऱ्या चर्चेदरम्यान तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. घटस्फोटाचे तुमच्या व पत्नीच्या सामाजिक, भावनिक व मानसिक आयुष्यावर कसे दुष्परिणाम होतील हे तुमच्या पत्नीस सांगू शकता. तुमच्या पत्नीच्या तिच्याकडे तुमच्याकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या तक्रारीबाबत तुमची बाजू जसे नोकरी, व्यवसायासाठी द्यावा लागणारा अधिकचा वेळ, आई-वडिलांच्यासाठी वाजवी व आवश्यक वेळ देण्याची आवश्यकता व त्यातील तुमची जबाबदारीची भावना व त्यातून तुमची कुटुंबवत्सलता याबाबत खुलेपणाने बोलावे. हा विषय बोलत असताना तिच्या तुमच्याकडून असलेल्या रास्त अपेक्षा विषयी होकारात्मकता दर्शवावी. तुमच्या पत्नीची तक्रार पाहता तुम्ही तिला कसे वेळ देऊ शकाल याबाबत काही प्रामाणिकपणे आश्वासित करावे. तसेच ‘नेहमी नवराच का हवा,’ ‘दिवसाला दोन वेळेला जेवण व वर्षाला दोन लुगडे व घरात टी.व्ही.’ दिले म्हणजे नवऱ्याची भूमिका संपली हा भाव नसावा. अशा प्रकारे केवळ इगो वा विसंवादामुळे निर्माण झालेला तणाव वा गैरसमज दूर करता येतील. तथापि तुम्ही दोघांनीही आपला मूळ पवित्रा कायम ठेवला तर मात्र विलग होणे
श्रेयस्कर. रुसवे-फुगवे, तणाव, फसविले गेल्याची भावना अशा नकारात्मक बाबीचे ओझे सोबत घेऊन कुणीच
आंनदी राहू शकणार नाही. तसे असेल तर तुम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घ्यावा हे योग्य व व्यावहारिक राहील.
त्याच्या अटी व शर्ती या चर्चेतच निश्चित कराव्यात.
तथापि मध्यस्था समोरील चर्चेत वरीलपैकी कोणताच तोडगा निघत नसल्यास तुम्हास वैवाहिक हक्काच्या पुनर्स्थापनेसाठी हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम 9 अन्वये न्यायालयात याचिका करता येईल. तथापी तुम्हीच नमूद केलेली वस्तुस्थिती ध्यानात घेता असे करणे कितपत सुज्ञपणाचे राहील याचा निर्णय तुम्हीच घ्यावा अन्यथा आईवडिलांपासून विभक्त राहण्याचा दुराग्रह, न्यायालयात खोटी तक्रार करणे, (तशी ती आहे हे तुम्हाला न्यायालयात सिद्ध करावे लागेल). यामुळे तुमचा कसा शारीरिक, मानसिक व भावनिक छळ झाला या मुद्यावर तुम्हास न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका करता येईल. कौटुंबिक हिंसाचाराची केस सकृतदर्शनीच तकलादू व कपोलकल्पित कथनावर दाखल केली असेल तर ती रद्दबातल करण्यासाठी न्यायालयात रीतसर अर्ज करता येतो. या केसमध्ये जर तुमचे काका-काकी, मावशी व तिचे यजमान हे वेगळ्या निवासस्थानात राहत असतील तर प्रस्तुतची तक्रार त्याच्या विरुद्ध उभी राहू शकत नाही. तसा अर्ज न्यायालयात करावा.