विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका! पंचायत ते संसद फक्त भाजपच हवा; अमित शहा यांचे हुकूमशाही बोल

विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उन्माद आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शिर्डीतील भाषणात दिसला. विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असला पाहिजे, असा हुकूमच त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांना दिला.

शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन आज पार पडले, त्यात शहा बोलत होते. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी महत्त्वाच्या महापालिका आणि त्याबरोबरच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये फक्त भाजपच जिंकला पाहिजे, असे ते म्हणाले. विकासाचे वर्तुळ तेव्हाच पूर्ण होते जेव्हा पंचायत ते संसद एकाच पक्षाचे सरकार असते. आता विधानसभेत आणि संसदेत भाजप आहेच, पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपचेच उमेदवार निवडून आले पाहिजेत, असे शहा यांनी सांगितले. विधानसभेनंतर आता आपले पुढचे लक्ष्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचे आहे. या निवडणुकीत विरोधकांना बसायला एकही शिल्लक राहणार नाही असा विजय मिळवून द्या, असे अमित शहा म्हणाले.

फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा दु:ख वाटले, डोळ्यांत पाणी आले

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीऐवजी उपमुख्यमंत्री व्हावे लागले तेव्हा मला दुःख झाले होते. माझ्या डोळय़ांत पाणी आले होते, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.

नड्डा म्हणाले होते, देशात फक्त भाजप हा एकच पक्ष राहील

भविष्यात देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. आज त्यांचीच री शहा यांनी ओढली, अशी प्रतिक्रिया यानंतर उमटली आहे.

पुढील तीन-चार महिन्यांत पालिकेच्या निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील निर्णय अंतिम टप्प्यात आहे. तो झाला तर पुढील तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.