
पवईतील व्हेंचुरी येथील 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या आणि 300 मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी जोडणीवर आज अचानक मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून दुरुस्तीसाठी 15 तास लागणार आहे. त्यामुळे घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील काही भागांच्या पाणीपुरवठय़ावर शनिवारी सकाळपर्यंत परिणाम होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. पवई व्हेंचुरी येथील जलवाहिनीला अचानक गळती लागल्याने घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला येथील काही भागांत आजपासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही काही वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.