तामीळनाडूतील नेते तमीळमध्ये सहीदेखील करत नाहीत, भाषावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला; आळवला मातृभाषेचा राग

तामीळनाडू आणि पेंद्र सरकारमध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण आणि त्रिभाषा धोरणावरून वाद सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामीळनाडूतील नेतेच तमीळमध्ये सहीदेखील करत नाहीत, असा टोला लगावला आहे. तसेच मी राज्य सरकारकडे मागणी करतो की त्यांनी तमीळ भाषेत वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करून मातृभाषेचा रागही आळवला. पंतप्रधान आज रामेश्वरमला पोहोचले. तेथे त्यांनी आशियातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे पुलाचे आणि इतर योजनांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन उपस्थित राहिले नाहीत.

मला तामीळनाडूच्या अनेक नेत्यांकडून पत्रे येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणताही नेता तमीळमध्ये सही करत नाही. तमीळ भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी या लोकांनी स्थानिक भाषेत सही करावी, असे पंतप्रधान म्हणाले. तमीळमध्ये वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून दिले तर राज्यातील विद्यार्थी आणि गरीब कुटुंबांना त्याचा फायदाच होईल, असेही ते म्हणाले.

मोदींनी रामसेतू पाहिला

श्रीलंकेहून परतताना त्यांनी विमानातून रामसेतू पाहिला. त्यांनी त्याचा एक व्हिडिओही पोस्ट केला. मला विमानातून रामसेतू दिसला. अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाचा सूर्यतिलक होत असतानाच हे घडले. तो एक दिव्य अनुभव होता. भगवान श्रीराम ही आपल्या सर्वांना जोडणारी शक्ती आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहोत असा अनुभव मोदींनी पोस्टद्वारे सांगितला आहे.

मोदींचे रामनाथ स्वामी मंदिरात ध्यान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिरात विधीनुसार पूजा केली. त्यानंतर त्यांनी काही वेळ ध्यानधारणाही केली. याआधी त्यांनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणा केली होती.

सीमांकनाबद्दलची जनतेची चिंता दूर करा स्टॅलिन

तामीळनाडूतील प्रस्तावित सीमांकन प्रक्रियेवरून राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. तामीळनाडूतील जनतेमध्ये सीमांकनामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पेंद्र सरकारने तामीळनाडूतील जनतेच्या अधिकाराच्या रक्षणासाठी सीमांकनावर पुनर्विचार करावा, असे आवाहन स्टॅलिन यांनी केले. तामीळनाडूच्या अधिकारांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश लागणार नाही, त्या दृष्टीने मोदींनी संसदेत एक प्रस्ताव मंजूर करायला हवा, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात स्टॅलिन बोलत होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाहीत असा सवाल प्रसारमाध्यमांनी केला असता मी एका कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे मी माझ्या मंत्र्यांना तिकडे पाठवल्याचे स्टॅलिन म्हणाले.