उद्यापासून दिवाळी सुरू होत असली तरी यंदा लक्ष्मीपूजनाच्या तिथीवरून लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. लक्ष्मी पूजन हे नेहमी अमावस्येला येते मात्र यंदाच्या कालनिर्णयनुसार अमावस्या ही नरक चतुदर्शीला म्हणजेच 31 ऑक्टोबरला आली आहे. तर लक्ष्मी पूजन हे 1 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे अनेकांना लक्ष्मी पूजन कधी करायचा असा प्रश्न पडला आहे. सोशल मीडियावर देखील काही व्हिडीओ असे फिरत आहेत ज्यात लक्ष्मी पूजन 31 ऑक्टोबरला करावे असे सांगण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रातील पंचांगानुसार लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबरलाच असून त्याच दिवशी पूजा करावी असे त्यात सांगितले आहे.
या वर्षी 31 ऑक्टोबरला दुपारी 3.53 ला अमावस्या सुरू होत आहे व 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.17 ला अमावस्या समाप्ती होत आहे. लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या प्रदोष काळात करायचे असते. 1 नोव्हेंबरला अमावस्या समाप्ती होत असली तरी सर्वाधिक प्रदोषकाळ याच दिवशी येत असल्याने 1 नोव्हेंबरलाच लक्ष्मीपूजनासाठी योग्य काळ असल्याचे पंचांगात सांगण्यात आले आहे. 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचं मुहूर्त आहे.
या आधी देखील 28 ऑक्टोबर 1962, 17 ऑक्टोबर 1963 आणि 2 नोव्हेंबर 2013 रोजी देखील यावर्षी प्रमाणेच योग आला होता.